पुणे: हडपसर येथील जेएसपीएम कॉलेज जवळील दुगड चाळ, सर्वे नंबर 49 मधील ‘झेड के हाईट्स’ (Z K Heights) येथे सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, पुणे महानगरपालिकेच्या ऑनलाईन पोर्टलवर तक्रार करूनही संबंधित अधिकाऱ्यांनी ती फेटाळून लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नेमका प्रकार काय?
हडपसर परिसरातील या भागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम सुरू असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी पुणे महानगरपालिकेच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदवली होती. मात्र, या तक्रारीवर कारवाई करण्याऐवजी महापालिकेचे कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) सागर सपकाळ यांनी ही तक्रार ‘रिजेक्ट’ केली आहे.
‘रिपीट तक्रार’ असल्याचे कारण देत वेळकाढूपणा
तक्रार क्रमांक WA226986 ही ऑनलाइन पोर्टलवर दाखल करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी ही तक्रार फेटाळताना ‘Repeated Complaint’ (पुनरावृत्ती झालेली तक्रार) असे कारण दिले आहे. धक्कादायक बाब अशी की, जर ही तक्रार वारंवार केली जात असेल, तर त्याचा अर्थ अद्याप त्या बांधकामावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. तक्रार ‘रिपीट’ होणे हे प्रशासनाचे अपयश असताना, तेच कारण देऊन तक्रार निकाली काढणे, हा एक प्रकारे अनधिकृत बांधकामाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय
एकीकडे ऑनलाईन पोर्टलवर तक्रारी फेटाळल्या जात आहेत, तर दुसरीकडे प्रत्यक्ष जागेवर अनधिकृत बांधकामाचा वेग प्रचंड वाढला आहे. “तक्रार रिजेक्ट करून अधिकारी गप्प का बसले आहेत? यामध्ये अधिकाऱ्यांचे काही आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत का?” असा थेट संशय आता नागरिक व्यक्त करत आहेत.
महानगरपालिकेने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन, संबंधित इंजिनिअरवर चौकशी करावी आणि अनधिकृत बांधकामावर तात्काळ हातोडा चालवावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.



