21.8 C
New York
Wednesday, June 10, 2026

Buy now

spot_img
spot_img

इंदापूर पोलीस स्टेशनच्या आशीर्वादाने; इंदापूर टोल नाक्यावर ‘काळ-पांढरं’ पत्त्यांच्या नावाखाली प्रवाशांची उघड लुटमार..

इंदापूर:सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी इंदापूर टोल नाक्याजवळील परिसर आता असुरक्षित बनला आहे. या ठिकाणी ‘काळ-पांढरं’ पत्त्यांच्या अवैध व्यवसायाचा सुळसुळाट झाला असून, प्रवाशांना धमकावून त्यांची लाखो रुपयांची उघड लुटमार केली जात असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, इंदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे अवैध धंदे दिवसेंदिवस फोफावत चालले आहेत.

अशी चालते लूटमारीची ‘मोडस ऑपेरांडी’

मिळालेल्या माहितीनुसार, या भागात ७ ते ८ जणांची एक संघटित टोळी सक्रिय आहे. टोल नाक्याजवळ बसेस किंवा वाहने थांबल्यानंतर ही टोळी ‘पैसेवाला’ प्रवासी हेरून त्याला स्वतःहून बोलण्यात गुंतवते. त्यानंतर त्याला फूस लावून या अवैध जुगाराच्या अड्ड्यावर आणले जाते.

तिथे आल्यावर प्रवाशाला जबरदस्तीने पैसे लावण्यास भाग पाडले जाते. जर प्रवाशाकडे रोख रक्कम (कॅश) नसेल, तर या टोळीने आजूबाजूच्या टपऱ्यांवर आपली माणसे आणि रोख रक्कम ठेवलेली असते. प्रवाशाच्या खात्यावरील शिल्लक रक्कम पाहून, त्याला ऑनलाईन पेमेंट करायला लावले जाते. पेमेंट स्वतःच्या खात्यावर वर्ग करून घेतल्यानंतर, तेवढीच कॅश प्रवाशाला दिली जाते आणि त्यानंतर पत्त्यांच्या खेळात फसवणूक करून ते पैसे लुटले जातात.

दमदाटी आणि शिवीगाळ

पैसे देण्यास नकार दिल्यास किंवा फसवणूक झाल्याचे प्रवाशाच्या लक्षात आल्यास, या टोळीकडून प्रवाशांना उघडपणे शिवीगाळ केली जाते, तसेच गंभीर धमक्या देऊन त्यांची तिथून रवानगी केली जाते. यामुळे अनेक प्रवासी भीतीने तक्रार करण्यास पुढे येत नाहीत.

पोलिसांची कारवाई फक्त ‘फोनवर’?

या वाढत्या अवैध धंद्यांबाबत इंदापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी विलास नाळे यांना यापूर्वीही स्थानिक नागरिक आणि माध्यम प्रतिनिधींनी कल्पना दिली होती. त्यावेळी “आम्ही तात्काळ कारवाई करू,” असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, प्रत्यक्षात ही कारवाई फक्त फोनवर बोलण्यापुरतीच मर्यादित राहिल्याचे चित्र आहे. प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने हे अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत.

“वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्व मॅनेज करतो!”

कारवाई का होत नाही, असे विचारले असता, सदर अवैध व्यवसाय चालवणाऱ्या मुख्य सूत्रधाराने “मी पोलीस स्टेशनपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना मॅनेज करतो, आमचे कोणी काहीही करू शकत नाही,” अशी दर्पोक्ती केल्याचे समजते. पोलिसांच्या याच कथित ‘अभयामुळे’ या गुन्हेगारांचे मनोबल वाढले असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

आवाहन: फसवणूक झालेल्या नागरिकांनी संपर्क साधावा

इंदापूर टोल नाक्याजवळ ज्या कोणी प्रवाशांची किंवा नागरिकांची अशा प्रकारे फसवणूक झाली असेल, त्यांनी घाबरून न जाता आमच्याशी (माध्यमांशी) संपर्क साधावा. या अवैध व्यवसायावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी आणि तुमचे फसवणूक झालेले पैसे परत मिळवून देण्यासाठी आम्ही तुम्हाला पूर्ण मदत करू.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या