13.6 C
New York
Sunday, April 12, 2026

Buy now

spot_img
spot_img

पुणे महानगरपालिकेच्या ‘झोन २’ मधील अधिकाऱ्यांचा संशयास्पद कारभार; अनधिकृत बांधकामावर कारवाई फक्त कागदावरच?

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक २ मधील कारभार सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कोंढवा बुद्रुक भागातील एका अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याने, संबंधित अधिकारी आणि बिल्डर यांचे संगनमत आहे का, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

नेमके प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, कोंढवा बुद्रुक येथील अनधिकृत आर.सी.सी. बांधकामाविरोधात ३१ ऑगस्ट २०२५ रोजी अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनंतर महापालिकेने नोटीस बजावली होती, मात्र आज १६ मार्च २०२६ उजाडला तरी प्रत्यक्ष जागेवर कोणतीही कारवाई झालेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे, कारवाई पूर्ण न करताच ऑनलाईन पोर्टलवर तक्रार ‘क्लोज’ (बंद) करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

व्हॉट्सॲपवर फक्त तारखांचा खेळ

तक्रारदाराने ‘जेई’ (Junior Engineer) उदय पाटील यांच्याशी केलेल्या संभाषणाचे पुरावे समोर आले आहेत. यामध्ये पाटील यांनी वारंवार “उद्या तारीख सांगतो”, “ट्रेनिंगमध्ये आहे”, “रजेवर आहे” अशी कारणे देऊन वेळ मारून नेल्याचे दिसते. फेब्रुवारी महिन्यात कारवाईचे आश्वासन देऊनही मार्च महिना अर्धा संपला तरी अद्याप बुलडोझर फिरलेला नाही. यामुळे जेई उदय पाटील आणि संबंधित अधिकारी दीपक सोनवणे यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.

महत्त्वाचे मुद्दे:

दप्तरदिरंगाई: तक्रार दाखल होऊन ६ महिन्यांहून अधिक काळ लोटला, तरी कारवाई शून्य.

बिल्डरशी अर्थपूर्ण संबंध? कारवाईत होणारा विलंब हा कामाच्या व्यापा मुळे आहे की बिल्डरशी असलेल्या वैयक्तिक हितसंबंधांमुळे, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

कागदोपत्री घोडे: प्रत्यक्ष जागेवर इमारत ५ मजल्यांपर्यंत उभी राहिली असताना, प्रशासन मात्र कागदोपत्री कारवाईचा दावा करत आहे.

आयुक्त कारवाई करणार का?

एकीकडे पुणे महापालिका अनधिकृत बांधकामांविरोधात कडक पावले उचलत असल्याचा दावा करते, तर दुसरीकडे झोन २ मधील अधिकारी तक्रारींकडे दुर्लक्ष करत आहेत. अशा हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या उदय पाटील यांच्यावर पुणे महानगरपालिका आयुक्त कठोर कारवाई करणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या