पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तातडीने बदली करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीने रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी सातत्याने मागणी लावून धरली होती. रश्मी शुक्ला यांच्याविरोधात काँग्रेससह विरोधकांनी आयोगाकडे तक्रारी केल्या होत्या. रश्मी शुक्ला यांची सेवा जून 2024 रोजी समाप्त झाली असतानाही भाजप, युती सरकारने जानेवारी 2026 पर्यंत त्यांना नियमबाह्य बढती दिली होती, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. त्यानंतर आज यावर निर्णय घेत निवडणूक आयोगाने शुक्ला यांची बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. अखेर काँग्रेस आणि महाविकास आघाडी त्यांच्या या मागणीला यश आल्याचं दिसतंय. उद्या 5 नोव्हेंबर दुपारी 1 वाजेपर्यंत तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची नावे राज्याच्या प्रशासनाने केंद्रीय निवडणूक आयुक्तांना पाठवायचे आहेत. त्यानंतर राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकांची निवड केली जाणार आहे.